भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. या लॉकडाउनमध्ये अनेक मजुरांनी स्थलांतर सुरु केलं आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने लोक पायी जाऊन गाव गाठत आहेत. अशात उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी कामगारांना मिळालेली वागणूक अमानुष आहे. बरेली शहराच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या कामगारांना सॅनिटायझर सोल्युशनने अंघोळ घालण्यात आली. या घटनेची काँग्रेसच्या उत्तर प्रदेश महासचिव प्रियंका गांधी यांनी निंदा केली आहे.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
हातावर पोट असलेल्या मजुरांना सॅनिटायझर सोल्युशनने अंघोळ घालण्यात आली. या प्रकाराचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. केमिकलने अंघोळ घालून त्यांचा बचाव होणार नाही, त्यांचं आरोग्य जपा म्हणजे त्यांना जगण्यास मदत होईल असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

हातावर पोट असणारे कामगार आपआपल्या राज्यांमध्ये पायीच चालत निघाले. हे कष्ट कमी म्हणून की काय आता त्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे वृत्त समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली शहराच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या कामगारांना रस्त्यावरच गटागटाने सॅनिटायझऱ सोल्युशनने अंघोळ घातली जात आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.