आयपीएलसाठी चिनी कंपनीलाच प्रायोजक म्हणून कायम ठेवण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या  निर्णयामुळे आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया संघपरिवारातील स्वदेशी जागरण मंचाने सोमवारी दिली आणि लोकांनीच या टी-२० क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा विचार करावा असे सांगितले.

चिनी प्रायोजकांसह ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेऊन बीसीसीआय व आयपीएलची नियामक परिषद यांनी शहिदांचा घोर अपमान केला आहे, असे स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक अश्वनी महाजन यांनी निवेदनात सांगितले.

‘बाजारपेठेतील चिनी वर्चस्वापासून आपली अर्थव्यवस्था मुक्त करण्याचा देश जोमाने प्रयत्न करत असताना आयपीएल नियामक परिषदेची ही कृती देशाच्या मनोभूमिकेवर ओरखडा उमटवणारी आहे. लोकांनी स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. चिनी कंपन्यांना या स्पर्धेचे प्रायोजक म्हणून कायम ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन त्यांनी आयोजकांना केले.

अब्दुल्ला यांची टीका

श्रीनगर : चीनने लडाखमध्ये घुसखोरी केल्यामुळे लोक चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत असताना आयपीएल क्रिकेट स्पर्धेला चिनी कंपन्यांसह सर्व प्रायोजक कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी केली. चीनच्या मोबाइल उत्पादक कंपन्या आयपीएलच्या मुख्य प्रायोजक म्हणून कायम राहतील; तर लोकांना चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सांगितले जात आहे. चीनचा पैसा, गुंतवणूक, प्रायोजकत्व व जाहिराती यांचा मुद्दा कशा रीतीने हाताळायचा याबद्दल आपण संभ्रमात असल्याचा टोला अब्दुल्ला यांनी हाणला.