केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील पेपरफुटीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन शिक्षक आणि कोचिंग क्लासमध्ये शिकवणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. रिषभ आणि रोहित अशी या दोन शिक्षकांची नाव असून कोचिंग क्लासमध्ये शिकवणाऱ्या तरुणाचे नाव तौकिर असे आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी झालेल्या बारावी परीक्षेच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर व्हॉट्स अॅपवर फुटल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला होता. दिल्लीतील तीन शाळा पोलिसांच्या रडारवर आल्या. मुख्याध्यापक, सहा शिक्षकांची पोलिसांनी कसून चौकशी देखील केली. यात बावना स्कूलमधील दोन शिक्षकांची पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. या दोघांनाही रविवारी सकाळी अटक करण्यात आली असून त्यांना दुपारपर्यंत न्यायालयात हजर केले जाणार आहे. या दोन्ही शिक्षकांनी परीक्षा सुरु होण्याच्या दोन तासांपूर्वीच पेपर फोडल्याची कबुली दिली.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात झारखंडमधील चात्रा जिल्ह्यातूनही दोन दिवसांत १२ जणांना अटक करण्यात आली. यात दहावीच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर शनिवारी खासगी शिकवणी वर्गाच्या दोन संचालकांसह चार विद्यार्थ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत सुमारे ६० जणांची चौकशी झाली आहे.