उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स भागात सोमवारी रात्री एका भरधाव मर्सिडीज मोटारीने उडविल्याने माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासात अल्पवयीन मुलगा मर्सिडीज चालवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एकाने या अपघाताची जबाबदारी स्वीकारली. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितला जातो आहे.
सिद्धार्थ शर्मा (वय ३२) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सिव्हिल लाईन्स भागात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या मर्सिडीजने त्याला उडवले. स्थानिकांनी लगेचच तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. शर्मा काम संपवून बाजारातून काही वस्तू आणण्यासाठी निघाला असताना हा अपघात झाला.
अपघातानंतर मंगळवारी सकाळी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबातील एकाने आपल्या हातून हा अपघात झाल्याचे पोलीस ठाण्यात येऊन सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला पोलीस ठाण्यातच रडू कोसळले. अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले.