कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या राज्यासाठी वेगळ्या झेंड्याच्या मागणीचे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी समर्थन केले आहे. बेंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील प्रत्येक राज्याला स्वत:चा झेंडा असावा. स्वतंत्र झेंडा हे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. राज्यासाठी वेगळा झेंडा ही एक चांगली कल्पना असेल. फक्त हा झेंडा फुटीरतावाद्यांचे प्रतिक बनू नये. देशातील सर्वच राज्यांकडे स्वत:चा झेंडा असावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कर्नाटक सरकारची स्वतंत्र झेंड्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाने फेटाळली होती. काँग्रेसच्या हायकमांडनेही याबाबत आपले हात झटकले होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कर्नाटक काँग्रेसला याप्रकरणी फटकारलेही होते. थरूर यांनी जरी सर्व राज्यांसाठी वेगवेगळ्या झेंड्याची मागणी केली असली तरी ट्विट करत यावर स्पष्टीकरणही दिले आहे. झेंड्याबाबत स्पष्ठ नियम असावेत. या नियमांमुळे राज्याच्या झेंड्यांना राष्ट्रीय ध्वज पेक्षा कमी महत्व मिळायला हवे. ते राष्ट्रीय ध्वजाचा पर्याय बनू नयेत, असे ट्विट केले.

कर्नाटकमध्ये वेगळ्या झेंड्याची मागणी वर्ष २०१२ पासून करण्यात येत आहे. तत्कालीन भाजप सरकारने हे देशाच्या एकता आणि अखंडतेविरोधात असल्याचे कारण सांगत विरोध केला होता. जेव्हा २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी हा मुद्दा उठवण्यात आला. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री गोविंद एम. करजोळ म्हणाले होते, फ्लॅग कोडनुसार राज्याचा वेगळा झेंडा करण्यास परवानगी नाही. आमचा राष्ट्रीय ध्वज देशाची एकता, अखंडतेचे प्रतीक आहे. जर राज्याचा वेगळा झेंडा झाला तर आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे महत्व कमी होईल. यामुळे प्रांतवादाची भावना वाढीस लागेल.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनीही या निर्णयास विरोध केला आहे. भारत एक देश आहे. एका देशात दोन झेंडे असू शकत नाही, असे ते म्हणाले.