कोलकात्याच्या एका प्रसिद्ध शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये मांसाहार खाण्यावरुन मोठ्या प्रमाणात वाद झाला. हा वाद इतका वाढला की अखेर शाळा प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आणि शाळेत मांसाहार आणल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या डब्ब्याचं वाटप इतरांसमवेत करु नये अशी नोटीस जारी करावी लागली. शाळेच्या या निर्णयामुळे शहरभर शाकाहारी आणि मांसाहारी खाण्यावरुन सामाजिक आणि राजकीय चर्चा सुरू झाली. शहरातील काही शाळांनी तर थेट मांसाहार आणण्यावरच बंदी घातली.

शाळेच्या मधल्या सुट्टीत एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला (जो शाकाहारी होता) आपल्या डब्ब्यातील चिकन सँडविच खाण्यास दिलं. त्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनी चिकन सँडविच खायला देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केली. पण, ज्याला चिकन सँडविच दिलं तो शाकाहारी असल्याचं माहित नव्हतं असं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं होतं. अखेर शाळा प्रशासनाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि वर्गात मांसाहारी डब्बा आणणाऱ्यांनी आपला डब्बा इतरांसोबत वाटप करुन खाऊ नये अशी नोटीस जारी करावी लागली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या घटनेमुळे इतर काही शाळांमध्येही टिफिन बॉक्सबाबत नियमावली बनवावी अशी मागणी होत आहे. काही शाळांनी तर स्पष्टपणे शाळेत मांसाहार घेऊन येऊ नये असं सांगितलं आहे, याशिवाय काही शाळांनी मांसाहारी डब्बा आणला असेल तर त्याची पूर्वकल्पना बरोबरीच्या मुलांना द्यावी अशी सूचना केली आहे. तर अन्य काही शाळांनी मासळी आणि अंडे आणण्याची परवानगी दिली आहे.