शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेल्या आरोग्य विषयक सेवांच्या तुटवड्यावरुन राजकारण करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतच देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाच्या हवाल्याने राजकीय हेतू मनात ठेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाशी खेळू नका असा सल्ला कोणाचाही थेट उल्लेख न करता, ‘झारीतले राजकीय शुक्राचार्य’ असं म्हणत दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशुन केलेल्या भाषणामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसी कोणालाही कमी पडणार नाही असं म्हटल्याचा संदर्भ राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. पुढे बोलताना राऊत यांनी, पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं सांगितलेलं असतानाही महाराष्ट्रात लसी, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता का निर्माण केली जातेय हा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे. “पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात तसं काही नसेलही पण मग हे कोण झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत जे फक्त महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खळतायत?”, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- महाराष्ट्राला ८० हजार रेमडेसिवीरची गरज असताना गुजरातमध्ये मोफत वाटप सुरुय : संजय राऊत

अशा संकट प्रसंगामध्ये राजकीय वैर घेऊन राजकारण करु नये, असंही राऊत यांनी प्रत्यक्षपणे कोणाचंही नाव न घेता म्हटलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री केंद्र सरकारशी संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केलाय.

आणखी वाचा- “तुटवडा असतानाही बांग्लादेशला ऑक्सिजन द्यायची काय गरज होती?” जितेंद्र आव्हाडांचा सवाल!

मोदी काय म्हणाले होते?

मागील काही दिवसांपासून देशात रोज अडीच लाखांहून अधिक करोनाबाधित आढळत आहेत. या पाश्र्वाभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ८.४५ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील करोनास्थिती, लसीकरण मोहीम आणि अन्य उपाययोजनांबाबत भाष्य केले. यावेळी मोदींनी देशामध्ये सर्व ठिकाणी आरोग्य सेवा सुरळीतपणे पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे देशातील जनतेला सांगितलं. तसेच सर्व साज्यांना सुचना करताना मोदींनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असल्याचंही स्पष्ट केलं. देशभरात करोना वेगाने फैलावत असून, संपूर्ण देश करोनाशी पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र, राज्यांनी लॉकडाउन टाळण्याचा प्रयत्न करावा. अखेरचा उपाय म्हणून लॉकडाउनकडे पाहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांना दिलाय. स्थलांतरित मजुरांनाही आश्वस्त करण्याचे आवाहन मोदींनी राज्यांना केले.