नवी दिल्ली : भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्थेला युमीफेनोवीर या औषधाच्या करोना रुग्णांवर चाचण्या करण्याची परवानगी मिळाली आहे.

तेथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, डॉ. राममनोहर लोहिया इन्स्टिटय़ूट ऑफमेडिकल सायन्सेस, एआरएचे लखनौ मेडिकल कॉलेज या प्रयोगात सहभागी होणार आहेत. हे औषध सुरक्षित मानले जात असून त्याचा वापर विषाणूंना मानवी पेशीत प्रवेश करण्यापासून रोखण्याकरिता होत आहे. युमीफेनोवीर हे प्रामुख्याने इन्फ्लुएंझावर वापरले जाते ते चीन व रशियात उपलब्ध आहे.

कोविड १९ रुग्णांवर त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याची परिणामकारकता भारतीय रुग्णात शोधण्याचे काम  लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्था करणार आहे. या संस्थेने हे औषध तयार करण्याची किफायतशीर प्रक्रिया शोधून काढली असून मे. मेडिझेस्ट फार्मास्युटिकल लि. या गोव्यातील कंपनीला या औषधाचे वितरण करण्याचा परवाना देण्यात आला आहे. लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे  संचालक प्रा. तपस कुंड यांनी सांगितलेकी, हे औषध किफातशीर व परिणामकारक असून सुरक्षितही आहे. त्यात प्रतिबंधात्मक  गुणधर्म आहेत. कोविड १९ विरोधातील एकातत्मिक धोरणाचा भाग म्हणून  या औषधाच्या चाचण्या करण्यात येत असल्याचे भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक शेखर मांडे यांनी सांगितले.