कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने १३ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली. ईडीने कोर्टाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने ९ दिवसांची कोठडी मान्य केली.

आर्थिक घोटाळाप्रकरणी शिवकुमार यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज (बुधवार) विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहाड यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. तत्पूर्वी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ५७ वर्षीय शिवकुमार यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

शिवकुमार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि दायन कृष्णन यांनी युक्तीवादादरम्यान, शिवकुमार यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याच्या ईडीच्या मागणीला विरोध केला. शिवकुमार यांनी चौकशीत कायम सहकार्य केले कधीही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, असे असतानाही त्यांच्यावर अशा प्रकारे कारवाई करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच शिवकुमार यांना आज जेवणही देण्यात आले नव्हते अशा प्रकारे ईडीकडून त्यांचा छळ करण्यात येत असल्याचा आरोपही शिवकुमार यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

सिंघवी यांनी म्हटले की, पोलीस कोठडी ही अपवाद असून ती कोणताही विचार न करता दिली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर शिवकुमार यांना ताब्यात घेऊन चौकशीची कारवाई ही राजकीय द्वेषभावनेतून करण्यात आली आहे. यावर कोर्टाने म्हटले की, प्राप्तिकराची चौकशी आणि अनेक साक्षीदारांच्या जबाबातून शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध करणाऱ्या बाबींचा खुलासा झाला आहे.

ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज आणि अधिवक्ता एन. के. मट्टा यांनी कोर्टाला सांगितले की, शिवकुमार चौकशीला टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच त्यांना चौकशीत सहकार्यही केलेले नाही तसेच महत्वाच्या पदावर असताना त्यांच्या मिळकतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळे शिवकुमार यांना अनेक कागदपत्रांसोबत चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच अवैध संपत्तीचे खुलासे करण्यासाठी त्यांना ताब्यात घेणे गरजेचे आहे.