कर्नाटकमधील हुबळीपासून सुमारे २० किमी दूर मोराब गावातील एका महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. परंतु, गावातील लोकांनी नंतर तलावातील पाणी पिण्यास नकार दिला. कारण आत्महत्या केलेली महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. प्रशासनाने लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आता संपूर्ण तलाव रिकामा करुन पुन्हा मलप्रभा कालव्यातून पाणी सोडण्यात येईल.

मोराब तलाव उत्तर कर्नाटकातील नावलगुंड तालुक्यातील सर्वांत मोठा तलाव असून पिण्याच्या पाण्याचा तो एकमेव स्त्रोत आहे. ग्रामस्थ सध्या ३ किमी अंतरावरील मलप्रभा कालव्यातून पाणी आणत आहेत. धारवाड जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र दोड्डामनी म्हणाले की, एचआयव्ही पाण्याने पसरत नाही, हे लोकांना सांगितले. परंतु, ते ऐकण्यास तयार नाहीत. अखेर तलाव रिकामा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, २९ नोव्हेंबरला एका महिलेचा मृतदेह तलावात आढळून आला होता. महिलेने आत्महत्या केल्यामुळे पाणी बाधित झाल्याची अफवा लोकांमध्ये पसरली. ग्रामस्थांनी पाणी पिण्यास नकार दिला. ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाला तलाव रिकामा करण्यास सांगितले. प्रशासनातील लोकांनी पाणी पिले. तरीही ग्रामस्थांनी ऐकले नाही. अखेर प्रशासनाने २० सायफन ट्यूब्स आणि पाण्याच्या चार मोटारींनी तलाव रिकामा करण्यास सुरुवात केली आहे.

मोराब येथील ग्रामस्थ मुट्टन्नाने सांगितले की, त्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. गावातील लोकांना संक्रमित पाणी प्यायचे नाही. जर हा मृतदेह सामान्य व्यक्तीचा असला असता तर लोकांनी पाणी पिलेही असते. परंतु, ही महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. त्यामुळे कोणालाच हे पाणी प्यायचे नाही. ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील यांनी तलावातील ६० टक्के पाणी अद्याप बाहेर काढायचे राहिले असून यासाठी किमान ५ दिवस लागतील असे म्हटले.

८ डिसेंबरला मलप्रभा कालवा बंद होणार आहे. त्यामुळे ६ डिसेंबरपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे काम होईल. तलाव भरायला वेळ लागेल. त्यामुळे नावलगुंडचे तहसीलदार हल्लूर यांनी मलप्रभा कालव्यातून तलाव भरण्यासाठी २० डिसेंबरची मुदत मागितली जाणार असल्याचे सांगितले.