आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता मात्र पाठिंबा न देण्याचे जाहीर केले आहे. अण्णांनी आपली भूमिका तडकाफडकी का बदलली, हे जाणून घेण्यासाठी आपण लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे माहिती आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. अण्णांना काही चुकीचे वाटल्यास त्यांनी जरूर सांगावे, आम्ही लगेचच त्यात सुधारणा करू, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्ष चांगला असून आपण त्याला पाठिंबा देऊ, असे अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र गुरुवारी त्यांनी केजरीवाल हे सत्तेसाठी आणि पैशासाठी राजकारणात उतरल्याचा आरोप करीत, आपण त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. अण्णांच्या या भूमिकेमुळे आम्हाला आश्चर्य वाटले असून लवकरच त्यांना भेटून त्यांच्याशी बोलणार आहोत. तसेच आमच्या चुका निदर्शनास आणून दिल्यास आम्ही त्यात नक्कीच बदल करू, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दक्षिण दिल्ली परिसरातील इमारती तोडण्याच्या होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्या  केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील मुख्यमंत्री निवासस्थानी केजरीवाल आपल्या शंभरहून अधिक समर्थकांसह सकाळी  पोहोचले. त्यांनी  दक्षिण दिल्लीत इमारतींवर सुरू असलेल्या कारवाईबाबत शीला दीक्षित यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली.