तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूला दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. अशात आता आमच्याकडे जयललिता यांचे जैविक आणि रक्ताचे नमुने आमच्याकडे नाहीत असे अपोलो रुग्णालयाने मद्रास हायकोर्टात सांगितले आहे. जयललिता यांचा मृत्यू नेमका का झाला याची कारणे अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत अशात अपोलो रूग्णालयाच्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

मद्रास हायकोर्टाने बुधवारी अपोलो रुग्णालयाला तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या रक्ताच्या आणि जैविक नमुन्यांबाबत अहवाल द्यावा असे म्हटले होते. मात्र या मागणीच्या उत्तरादाखल आमच्याकडे जयललिता यांच्या रक्ताचे आणि जैविक नमुने नाहीत असे रूग्णालयाने म्हटले आहे.

अपोलो रूग्णालय प्रशासनाने जस्टिस एस. विद्यानाथन यांच्या मागणीनंतर हे उत्तर दिले आहे. २२ सप्टेंबर २०१६ रोजी जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ५ डिसेंबर २०१६ रोजी जयललिता यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमृता नावाच्या एका मुलीने आपण जयललिता यांची मुलगी असल्याचा दावा केला. अमृताने डीएनए चाचणीचीही मागणी केली होती. मात्र आता या सगळ्या प्रकरणात आमच्याकडे जयललिता यांच्या रक्ताचे आणि जैविक नमुने नसल्याचे अपोलो रूग्णालयाने म्हटले आहे.