एका वर्षांसाठी आश्रय देण्याचे रशियाने मान्य केल्यानंतर अमेरिकेच्या गोपनीय बाबी उघड करणारा एडवर्ड स्नोडेन याने मॉस्को विमानतळावरून प्रयाण केले. स्नोडेनचे वकील अ‍ॅण्टोली कुचेरेना यांनी ही माहिती दिली.
स्नोडेन याला रशियामध्ये एका वर्षांसाठी तात्पुरता आश्रय देण्यात आल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याने शेरेमेटय़ेव्हो विमानतळावरून प्रयाण केले, असे कुचेरेना यांनी संगितले. गेल्या महिनाभरानंतर प्रथमच त्याने रशियाची हद्द ओलांडली. सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या वास्तव्याचे स्थान गुप्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळेच त्याला लोकांनाही भेटता येणार नाही. आपल्याला कोठे जायचे आहे, ते तो स्वत: ठरविणार असल्याचे कुचेरेना म्हणाले.दरम्यान, स्नोडेनचे वडील लॉन स्नोडेन हे लवकरच आपल्या पुत्रास भेटण्यासाठी रशियास येण्याचे सूतोवाच कुचेरेना यांनी केले.