पाकिस्तानच्या आर्थिक स्थैर्यासाठी दहशतवादाविरुद्धचे युद्ध कोणत्याही स्थितीत आम्ही जिंकू, असा विश्वास पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केला. देशातील विजेच्या टंचाईवर मात करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
देशातील सर्व संस्था दहशतवादाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी एकत्रित आहेत. आम्ही कोणत्याही स्थितीत हे युद्ध जिंकणारच, कारण हा प्रश्न  देशाच्या आर्थिक स्थैर्याशी निगडित आहे. इतकेच नव्हे तर भविष्यातील पिढय़ांशीही हा प्रश्न निगडित आहे. त्यामुळे हे युद्ध संपूर्ण देशाचे युद्ध आहे, असे शरीफ म्हणाले.
पेशावरमध्ये तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला करून शालेय विद्यार्थ्यांचे हत्याकांड घडविले त्यामुळे देशातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा सरकारचा निर्धार अधिक दृढ झाला. ही विषवल्ली आम्ही देशातून हद्दपार करू, दहशतवादाचा पूर्ण बीमोड होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
आपल्या सरकारचा कालावधी २०१८ मध्ये पूर्ण होणार असून तोपर्यंत देशात विजेचे भारनियमन रद्द झालेले असेल आणि वायूचा तुटवडाही नसेल, असे आश्वासनही या वेळी शरीफ यांनी दिले. दहशतवादविरोधी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तुकडीला निरोप देताना ते बोलत होते.