फेसबुकवर बलात्कार तसेच हत्यांचे लाईव्ह व्हिडीओ पोस्ट केल्याच्या घटना ताज्या असतानाच अशा व्हिडीओंवर चाप लावण्यासाठी फेसबुक पुढील वर्षभरात तीन हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने बुधवारी कम्यूनिटी टीममध्ये तीन हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे जाहीर केले. मार्क झकरबर्गने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. यात झकरबर्ग म्हणतो, हत्या, आत्महत्या किंवा बलात्काराचे लाईव्ह व्हिडीओ पोस्ट केल्याच्या घटना दुर्दैवी आहे. सध्या फेसबुकवरील व्हिडीओंवर लक्ष ठेवण्यासाठी कम्यूनिटी टीमध्ये साडे चार हजार कर्मचारी काम करत आहे. आता पुढील वर्षभरात या टीममध्ये आणखी ३ हजार कर्मचाऱ्यांची भरती करु असे त्याने सांगितले. तुम्हाला सुरक्षित समाज हवा असेल तर तात्काळ कृती करणे गरजेचे असते. फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओ तसेच अन्य व्हिडीओंविषयी तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन ते व्हिडीओ फेसबुकवरुन डिलीट व्हावे यादिशेने आम्ही काम करत आहोत असे झकरबर्गने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक लाईव्ह या फिचरचा दुरुपयोग होत असल्याचे समोर आले होते. थायलंडमध्ये एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली होती. हा सर्व प्रकार त्याने फेसबुवर व्हिडीओच्या माध्यमातून अपलोड केला होता. सुमारे २४ तास हा व्हिडीओ फेसबुकवर होता. तर अमेरिकेतील एका वृद्धाच्या हत्येचा व्हिडीओदेखील फेसबुकवर अपलोड करण्यात आला होता. या घटनांनंतर फेसबुकने असे व्हिडीओ तातडीने डिलीट करण्याची तसेच फेसबुक लाईव्हवर करडी नजर ठेवण्याची मागणी विविध स्तरातून होत होती.