विरंगुळा आणि समाजाशी ‘कनेक्ट’ होण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ज्या फेसबुकचा आधार घेतला जातो, त्याच संकेतस्थळाबद्दल धक्कादायक निरीक्षणे पुढे आली आहेत. फेसबुकवरील आपले ‘यशस्वी’ मित्र आणि सहकाऱ्यांचे प्रसन्न जीवनमान माणसांमधील द्वेषभावना वाढीस लावते, असे संशोधनात आढळले आहे.
 भावना व्यक्त करण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून वापर केलेल्या फेसबुकच्या काही युवकांशी संवाद साधत, बर्लिन येथील हंबोल्ट विद्यापीठाच्या डॉ. हॅना क्रॅसनोव्हा यांनी संशोधन अहवाल तयार केला. आश्चर्य म्हणजे, एकुणांपैकी एकतृतीयांश जणांनी फेसबुकच्या वापरानंतर आपल्यामध्ये नकारात्मक भावना वाढीस लागल्या असल्याचे मत नोंदविले. आणि फेसबुकवरील ‘फ्रेंडस्’ चे यश आपल्याला पचविता येत नसल्याचेही या सर्वानी मान्य केले. सामाजिकदृष्टय़ा यशस्वी अथवा सकारात्मक ठरणाऱ्या व्यक्तींची तुलना करण्याचा मोह अनेकदा अनेकांना होतो. आणि त्याचे थेट पर्यवसान द्वेषभावनेत होत असल्याचा निष्कर्ष डॉ. क्रॅस्नोवा यांनी मांडला आहे. सोशल नेटवर्किंग साइटस्चा वापर संवादापेक्षा फोटो-न्यूजफीडस् आणि माहितीवर ‘नजर’ ठेवण्यासाठी करणारे द्वेषभावनेचे प्रामुख्याने बळी ठरत असल्याचे निरीक्षणही डॉ. क्रॅस्नोव्हा यांनी नोंदवले. फेसबुकचा अतिवापर  आणि जीवनाबद्दल समाधानी असणे यातील संबंधही पडताळण्यात आला. त्यामध्ये वाढत्या नकारात्मक भावना आणि द्वेष यामुळे अशा व्यक्ती असमाधानी असल्याचे दिसले.