अंतर्गत बंडाळी, हिंसाचार आणि अनागोंदी या त्रराशिकाने त्रस्त असलेल्या मध्य आफ्रिका प्रजासत्ताकाच्या बांगुई या राजधानीच्या शहरात फ्रेंच सुरक्षारक्षकांनी मंगळवारी केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. पंतप्रधान मनमोहन सिंग ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेसाठी येथे आलेले असतानाच ही घटना घडली, हे विशेष.  
मध्य आफ्रिका प्रजासत्ताक सध्या अंतर्गत बंडाळीने त्रस्त आहे. या पाश्र्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघाने देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. बांगुई विमानतळाची सुरक्षाव्यवस्था फ्रान्सकडे आहे. मंगळवारी सकाळी या विमानतळावर बंडखोर व सुरक्षारक्षक यांच्यात चकमक उडाली. या सर्व गदारोळात दोन भारतीयांचा गोळी लागून मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.
दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगळवारी येथे पोहोचले. पंतप्रधानांनी मध्य आफ्रिका प्रजासत्ताकातील घटनेची दखल घेत तेथील १०० भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याचे आदेश संबंधितांना दिले.