जर तुम्ही पोस्टाचे ग्राहक आहात आणि पोस्ट कार्यालयात तुमचं बचत खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता बँकेप्रमाणं तुम्हाला पोस्टाच्या बचत खात्यात किमान रक्कम ठेवणे बंधनकारक असणार आहे. ११ डिसेंबर २०२० पासून म्हणजेच उद्यापासून हा नवा नियम देशभरात लागू होणार आहे. तसेच जर तुम्ही ही किमान रक्कम खात्यात राखू शकला नाहीत तर तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे.

अधिक माहितीसाठी या लिंकला भेट द्या

भारतीय पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर या नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, कोणत्याही बचत खात्यावर आता ग्राहकांना किमान ५०० रुपये बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. जर ग्राहकानं ही किमान रक्कम बचत खात्यात ठेवली नाही तर त्याला १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच जर खात्यातील रक्कम ही शून्य झाली तर ग्राहकाचं खात बंदही केलं जाऊ शकतं.

पोस्ट खात्याकडून दिल्या जातात ‘या’ बचत योजना

भारतीय पोस्टाकडून विविध छोट्या बचत योजना दिल्या जातात. यांनाच पोस्ट ऑफिस सेविंग्ज स्किम्स असं संबोधलं जातं. यामध्ये पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) या योजनांचा समावेश आहे.