देशात पवित्र समजल्या जाणा-या गंगा नदीचे पाणी थेट पिण्यास योग्य नसल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डा (सीपीसीबी) ने म्हटले आहे. याबरोबरच बोर्डाने असे देखील सांगितले आहे की, नदी वाहत असलेल्या ठिकाणांपैकी सात जागाच अशा आहेत, ज्या ठिकाणचे पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच आपण पिण्यास वापरू शकतो. सीपीसीबीच्या आकडेवाडीनुसार उत्तर प्रदेशपासून पश्चिम बंगाल पर्यंत गंगा नदीचे पाणी पिण्यास योग्य नाही. एवढेच नाहीतर अनेक ठिकाणचे गंगा नदीचे पाणी अंघोळीसही योग्य नसल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नकाशात नदीत ‘कोलिफोम’ जीवाणुचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दाखवले गेले आहे. एकुण ८६ ठिकाणी स्थापलेल्या थेट निरीक्षण केंद्रांपैकी केवळ सात भाग असे आढळून आले आहेत की, जेथील पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच पिण्या योग्य आहे. तर ७८ भागांमधील पाणी अयोग्य आहे. नदीच्या पाण्याच्या गुणवत्ता तपासण्यासाठी देशभरात गंगा नदीपात्रात थेट निरीक्षण केंद्रांकडून माहिती संकलीत केली गेली आहे.

हिंदू धर्मात गंगा नदीला मातेसमान पवित्र मानतात तिची पुजा करतात, याशिवाय गंगा नदीच्या पाण्याची तुलना अमृताशी देखील करतात. खरेतर काही वर्षे अगोदरपर्यंत गंगा नदीचे पाणी अनेक दिवस ठेवल्यानंतरही त्यात कोणतीही घाण होत नव्हती. सीपीसीबीने म्हटले आहे की, भारताची जीवनदाईनी मानल्या जाणा-या गंगा नदीत डुबकी मारण्यासाठी लाखो लोक एकत्र येतात, मात्र या नदीचे पाणी एवढे प्रदुषित झाले आहे की, ते पिण्यास तर सोडाच पण अंघोळीसाठी देखील उपयुक्त नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकार आतापर्यंत सातत्याने गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करत आहोत, असे सांगत आलेले आहे.