News Flash

गुजरात : भीषण अपघातात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा ट्रकखाली चिरुडून मृत्यू

ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

फोटो सौजन्य : ट्विटरवरुन साभार

गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.

अपघाताच्या वृत्ताला दुजोरा देताना, “किमान १३ जणांना ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सुरतमधील कोसांम्बामध्ये घडलीय,” असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसेच मरण पावलेले व्यक्ती ही मजूर असून ते सर्वजण मूळचे राजस्थानमधील रहिवाशी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान या १३ जणांबरोबरच त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांचाही नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. पोलिसांनी या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मदतकार्य सुरु आहे.

फोटो सौजन्य : ट्विटरवरुन साभार

सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणाऱ्या किम मांडवी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. किम हाकर मार्गाजवळ एका ट्रकचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रात्री बारानंतर झालेल्या या अपघातामध्ये ट्रक एका ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला. मांडवीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रॅकवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 8:12 am

Web Title: gujarat 15 people died after they were run over by a truck in kosamba surat scsg 91
Next Stories
1 Corona Vaccination : कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणार देशातील ‘या’ बड्या कंपन्या; लस खरेदीसाठी हलचाली सुरु
2 ‘ट्रॅक्टर मोर्चा’वर शेतकरी ठाम
3 आठ महिन्यांतील सर्वात कमी करोनाबळी
Just Now!
X