बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला २००२ च्या धडका आणि पळा प्रकरणात (हिट अँड रन केस) न्यायालयाने निर्दोष सोडल्याच्या प्रकरणी राज्य सरकारने केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने सलमान खानला म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस जारी केली आहे. सलमान खान याला आम्ही दोषमुक्त केले तर तो कायमचा या प्रकरणातून सुटणार आहे व त्याची बाजू खरी ठरणार आहे, त्यामुळे आम्ही खबरदारी घेत आहोत असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्या. जे. एस. केहार व व्ही. नागप्पन यांनी सांगितले की, सलमानला आम्ही या प्रकरणात दोषमुक्त केले, तर तो अखेरचा निर्णय असणार आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल केलेल्या अपिलावर आम्ही सलमानला त्याचे म्हणणे मांडण्यास नोटीस जारी केली आहे. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने सलमानला सोडताना दोन मुद्दय़ांवर चुका केल्या आहेत एक म्हणजे त्यांनी कलम ३३ अन्वये पुरावा कायद्याअंतर्गत कनिष्ठ न्यायालयात करण्यात आलेल्या अर्जात त्रुटी असल्याचे मान्य केले होते. दुसरे म्हणजे उच्च न्यायालयाने रवींद्र पाटील या कॉन्स्टेबलने दिलेली साक्ष विश्वासार्ह मानण्यास नकार दिला व त्याची साक्ष इतरांशी जुळत नसल्याचे म्हटले होते. उच्च न्यायालयाने सलमानला सोडताना असे म्हटले होते की, पाटील याने एफआयआरमध्ये जाबजबाब नोंदवताना सलमान खान याने मद्यपान केल्याचे न सांगता बाकी सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. एफआयआर हा काही माहितीकोश नसतो असे रोहतगी यांनी सांगितले. रवींद्र पाटील यांच्या जबाबानुसार सलमान विलेपार्ले येथे रेन बार अँड रेस्टॉरंट येथे गेला होता व नंतर त्याची टोयोटा लेक्सस मोटार बांद्रा येथे एका दुकानात घुसली होती त्यात एकजण ठार तर इतर अनेक जखमी झाले होते. सलमानचे वकील कपील सिब्बल यांनी सांगितले, पाटील यांनी दिलेल्या जबानीत आमच्या अशिलाने दारू सेवन केल्याचे म्हटले नव्हते.