बलात्काराच्या आरोपांमध्ये दोषी ठरल्याने तुरुंगाची हवा खात असलेल्या बाबा राम रहिम याच्या सिरसा येथील ‘डेरा सच्चा सौदा’ आश्रमाच्या मुख्यालयात मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे. हरयाणा पोलिसांनी येथून मोठ्या प्रमाणावर रायफल्स आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्यारे आढळून आल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.


या कारवाईनंतर पोलीस जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची सखोल माहिती घेत आहेत. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने आश्रमात हत्यारांचा साठा का करण्यात आला, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरच डेराच्या मुख्यालयात सुरक्षा रक्षकांना प्रवेश करता येणार आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ‘डेरा सच्चा सौदा’ प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे न्यायालयाकडून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीने प्रशासनाला येथे थेट कारवाई करता येणार आहे.

२५ ऑगस्ट रोजी पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कारप्रकरणी बाबा राम रहिम याला दोषी ठरवले होते. त्यानंतर दोन दिवसांनी २७ ऑगस्ट रोजी त्याला बलात्काराच्या दोन प्रकरणांमध्ये प्रत्येकी दहा वर्षे अशी एकूण २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. हरयाणात बाबांच्या अटकेनंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्यामुळे सरकारला लष्कराला पाचारण करावे लागले होते. सध्या बाबा राम रहिम रोहतकच्या सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत आहे.