‘रोजगार उपलब्ध करुन देण्यात आणि शेती उत्पन्न संरक्षीत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयशस्वी झाले आहेत. त्यांच्याकडून जर हे काम होणार नसेल तर त्यांनी तसे सांगावे, काँग्रेस सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेला उभारी देईल’, असे आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना दिले.


अमेठी या आपल्या लोकसभा मतदार संघात शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र सरकारने कृषी क्षेत्रावरील तणाव वाढवल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदी सुरुवातील मनरेगा ही योजना बेकार चीज असल्याचे म्हणत होते. मात्र, काही महिन्यांतच याच पंतप्रधानांनी या योजनेमध्ये फायदा असल्याचे सांगितले होते.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’बाबत मोदी बोलतात. मात्र, ते रोजगार उलब्ध करु शकलेले नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये आता रागाची भावना आहे. म्हणूनच मोदींना आता देशाचा वेळ वाया घालवू नये, त्यांनी शेतकऱ्यांवर आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत करावे. जर त्यांना हे जमणार नसेल तर त्यांनी तसे सांगावे. काँग्रेस यामध्ये लक्ष घालून केवळ सहा महिन्यांत परिस्थीती बदलून दाखवेल, असे राहुल शेतकऱ्यांशी बोलताना म्हणाले.

देशाच्या विकास दरावरुन राहूल यांनी यावेळी मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या तिमाहीतील विकास दर हा गेल्या तीन वर्षांतील निचांकी पातळीवर (५.७ टक्के) राहिला. या आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन हेच लक्षात येते की, अर्थव्यवस्था अद्यापही कमजोर अवस्थेत आहे.
सरकारच्या धोरणांमुळे देशात सध्या कृषीसंकट आले असून ते अनेक राज्यांत पसरले आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत. अनेक राज्य सरकारांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागत असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने जबरदस्तीने वस्तू आणि सेवा कर लादून छोट्या व्यावसायीकांना आणि दुकानदारांना दुखावल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.