जर तुम्ही इन्स्टाग्रामवर आपल्या अलिशान कारचा फोटो अपलोड केला असेल किंवा फेसबुकवर महागड्या घड्याळाचा फोटो शेअर केला असेल तर आयकर अधिकारी तुमच्या दारात हजर झालेच म्हणून समजा! कारण आयकर विभाग काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटवर करडी नजर ठेवणार आहे. पुढील महिन्यापासून आयकर विभागाने ‘प्रोजेक्ट इनसाइट’ हाती घेतले आहे.

या विशेष मोहिमेंतर्गत आयकर विभाग संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साइटवरील माहिती पडताळून त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहणार आहेत. करचोरी रोखण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घोषित केलेले उत्पन्न आणि संबंधित व्यक्तीचा खर्च यातील फरकाची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न आणि संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे.

आयकर विभागाने गेल्या वर्षी या प्रोजेक्टसाठी एल अॅण्ड टी इन्फोटेकबरोबर करार केला होता. कर भरणा करण्यात कशी सुधारणा करता येईल, याची माहिती एकत्र करण्याचा हा प्रकल्प राबवण्याचा हेतू आहे. सध्या या प्रकल्पाची चाचणी सुरू आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या रकमेचे व्यवहार रोखणे आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांना मदत होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पामुळे माहिती गोळा करण्यास मदत मिळेल आणि कर भरण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊ शकेल.