न्यूयॉर्कमधील चर्चासत्रात प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पानगढिया यांचे मत

न्यूयॉर्क : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध ही भारतासाठी मोठी संधी असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या चीनबाहेर पर्याय शोधत आहेत, असे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अरविंद पानगढिया यांनी येथे एका चर्चासत्रात सांगितले.

भारतीय महावाणिज्यदूतावासाने हे चर्चासत्र आयोजित केले होते.

भारताने आयात मोटरसायकल व स्वयंचलित वाहनाबाबत अमेरिकेसोबत वाटाघाटीअंती आयात कर कमी करावा, असे सांगून ते म्हणाले की, चीनमधून बहुराष्ट्रीय कंपन्या आता बाहेर पडत आहेत. ही भारतासाठी मोठी संधीची वेळ आहे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांना  भारतात आकर्षित करण्याची गरज आहे. अमेरिका चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्या पर्याय शोधत आहेत, कारण चीनमध्ये वेतनमानही वाढले आहे.

अमेरिकेनेही बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रवेश बंद केला आहे. व्यापार युद्धात दोन्ही देश एकमेकांना घायाळ करीत सुटले आहेत. ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम व पोलाद वस्तूंवर गेल्या वर्षी मार्चमध्ये कर वाढवले होते. त्यामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकले होते. त्यानंतरही चीनच्या २५० अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर अमेरिकेने आकारला होता, त्यावर चीननेही अमेरिकी आयात वस्तूंवर आयात कर वाढवला आहे.

काही वादाच्या मुद्दय़ांवर विवेचन करताना त्यांनी सांगितले की, माहिती स्थानिक पातळीवर साठवण्यात यावी असा  भारताचा आग्रह आहे. याशिवाय हार्ले डेव्हीडसन मोटरसायकलींवरील कराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. तो वाटाघाटीतून सोडवता येईल. हार्ले डेव्हीडसन मोटरसायकलवरचा कर काढून टाकावा त्यात काही अडचण असण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्याच ग्राहकांना किती काळ शिक्षा देणार आहात. सत्तर वर्षे संरक्षण दिले, आता आणखी किती काळ ते देणार. सध्या वाहनांवरील कर हे भारतात १०० टक्के आहेत. त्यातील काही करांना अर्थच नाही.  त्यातून कुणाचा  फायदा होत आहे याचा विचार केला पाहिजे.

फेब्रुवारीत भारताने हार्ले डेव्हीडसन मोटरसायकलवरचा कर ५० टक्के कमी केला होता. तरी तो अन्यायच आहे असे अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते. ते म्हणाले की,  भारताने आयात शुल्क वाढवण्याच्या ऐवजी विनिमय दराचे साधन वापरावे. रुपयाचे काही प्रमाणात अवमूल्यन झाले तरी चालेल. निर्यातदारांना दारे खुली केली पाहिजेत. व्यापाराचे उदारीकरण व्हायला हवे. १९९० मध्ये भारताने हेच केले होते. भारताचे अमेरिकेशी संबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांच्याशी व्यापार युद्धात पडून आपला फायदा नाही. भारतातील व्यापार वातावरण अजूनही फारसे सुधारलेले नाही. भारताने अनेक व्यापार अडथळे सुरू केले आहेत. त्याचा अमेरिकी व्यापारावर नकारात्मक परिणाम झाला आहे.

अमेरिका भारताला बाजारपेठ खुली करायला सांगत आहे ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. अमेरिकेशी वाटाघाटी करून बाजारपेठ खुली करायला हवी. त्यांना काहीतरी द्या व त्यांच्याकडून काहीतरी घ्या असे धोरण ठेवायला हवे.

-अरविंद पानगढिया, अर्थशास्त्रज्ञ.