बालसोर : भारताच्या अग्नि ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी येथील डॉ. अब्दुल कलाम बेटांवर सोमवारी यशस्वीरीत्या घेण्यात आली. त्याचा पल्ला पाच हजार किलोमीटरचा आहे. स्वदेशी बनावटीच्या अग्नि ५ क्षेपणास्त्राची ही सातवी चाचणी असून ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अग्नि ५ हे तीन टप्प्यांचे क्षेपणास्त्र असून १७ मीटर उंच व २ मीटर रुंद आहे. १.५ टन अण्वस्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, एकात्म चाचणी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाच्या तळावरून मोबाईल लाँचरच्या मदतीने हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. सामरिक दल कमांड तसेच संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी ही चाचणी केली. यात रडार, देखरेख उपकरणे, देखरेख स्थानके यांचा सहभाग होता. उच्च वेगाचा संगणक व चुका विरहित आज्ञावली यांच्या मदतीने या क्षेपणास्त्राचे उड्डाण अचूकपणे झाल्याचे सांगण्यात आले. हे क्षेपणास्त्र अशा पद्धतीने सोडण्यात आले की, एका विशिष्ट मार्गावर पोहोचल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीकडे वळून लक्ष्यावर आघात करू शकले. त्याचा मार्ग संगणकाने निश्चित केलेला होता. हे क्षेपणास्त्र जेव्हा पुन्हा पृथ्वीच्या  वातावरणात प्रवेश करते तेव्हा त्याचे घर्षण होऊन तापमान चार हजार अंश सेल्सियसपर्यंत वाढते पण त्याला स्वदेशी  बनावटीचे उष्णतारोधक कवच असल्याने आतले तापमान पन्नास अंश सेल्सियसच्या खाली राहते. यात गायरो इनर्शियल सिस्टीम, डिजिटल कंट्रोल सिस्टीम यांचा वापर केला असून रडार व इलेक्ट्रो ऑप्टिकल यंत्रणांच्या निरीक्षणानुसार क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य भेद केला आहे. अग्नि ५ क्षेपणास्त्राच्या पहिल्या दोन चाचण्या २०१२ व २०१३ मध्ये घेण्यात आल्या होत्या. ३१ जानेवारी २०१५ रोजी तिसरी, २६ डिसेंबर २०१६ रोजी चौथी, तर या वर्षी अठरा जानेवारीला पाचवी चाचणी करण्यात आली. अखेरची चाचणी ३ जून २०१८ रोजी झाली होती.

क्षेपणास्त्रांचा पल्ला

* अग्नि १- ७०० कि.मी.

* अग्नि २- २००० कि.मी.

* अग्नि ३- २५०० कि.मी.

* अग्नि ४- ३५०० कि.मी.

* अग्नि ५-५००० कि.मी.