चीनचे पंतप्रधान ली केक्विआंग यांच्या या महिन्यातील भारतभेटीत लडाखमधील चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी द्विपक्षीय चर्चा यापुढेही सुरू ठेवण्याचा आग्रह भारत धरणार आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीचा मुद्दा कसा हाताळला, यासंबंधीचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. उभय देशांच्या नेत्यांचे द्विपक्षीय दौरे आणि उभय देशांमध्ये सौहाद्र्राचे संबंध असताना चीनचे निश्चित हेतू समजले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, चीनने आपले सैन्य कोणत्याही परिस्थितीत १९ मेपर्यंत विनाअट मागे घ्यावे, ही भूमिका भारताने घेतली. चुमर भागातील खंदक उद्ध्वस्त करण्यात आल्याचा अधिकाऱ्यांनी इन्कार केला.
दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची बुधवारी भेट घेऊन देस्पांग खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीबद्दल त्यांच्याशी दोन तास विस्तृत चर्चा केली.
या वर्षी उभय देशांचे नेते भेटीची तयारी करीत असून या घडीला भारत-चीन संबंधांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असल्याचे प्रतिपादन वांग यी यांनी केले. चीनचे पंतप्रधान ली केक्विआंग यांच्या भारतभेटीपाठोपाठ भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे या वर्षी नंतर चीनभेटीवर जात आहेत. यी यांच्या वक्तव्यास या दौऱ्यांचा संदर्भ होता. खुर्शीद यांच्या दौऱ्याकडेही त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.