दहशतवाद्यांचे नंदनवन अशी ओळख असलेल्या पाकिस्तानने भारताला आता थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी देतोय असे जर भारताला वाटत असेल तर भारतावर आम्ही हल्ला करून अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देऊ असे ट्विट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आसिफ ख्वाजा यांनी केले आहे.

पाकिस्तान देत असलेली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी पोकळ आहे या आशयाचे वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले. त्याला उत्तर देताना आसिफ ख्वाजा यांनी हे ट्विट केले आहे. भारताच्या लष्करप्रमुखांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. त्यांचे हे वक्तव्य आमच्या अण्वस्त्र हल्ल्याला दिलेले आमंत्रण आहे असेच वाटते आहे. आम्ही पोकळ धमकी देत नाही, भारताला अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव हवा असेल तर तो आम्ही हल्ला करून देऊ असा इशाराच आसिफ ख्वाजा यांनी दिला आहे.

बिपीन रावत यांनी केलेले वक्तव्य आम्ही सहजपणे घेतलेले नाही हे लक्षात ठेवा. पाकिस्तानबाबत गैरसमज करून घेऊ नका, आमचे रक्षण कसे करायचे हे आम्हाला चांगले ठाऊ क आहे असे म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनीही ट्विट करून भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकी पोकळ आहे, त्याला काही अर्थ नाही. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर त्यांना जशास तसे उत्तर मिळेल असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्याचा निषेध नोंदवताना पाकिस्तानने भारताला थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकीच दिली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१६ मध्ये ख्वाजा आसिफ यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनीच भारताविरोधात गरळ ओकत अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध तणावाचे आहेत. पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबताना दिसत नाहीत. दहशतवाद्यांची घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार होताना दिसते आहे. अशात आता पाकिस्तानने पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. या धमकीला भारताकडून कसे उत्तर दिले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.