जगातील सर्वांच उंचावरील युद्धभूमी असलेला लडाखमधील सियाचीन ग्लेशिअरचा भाग आता सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय लष्कराकडून यासाठी परवानगी देण्याबाबत विचार सुरु आहे. या ठिकाणी आपले जवान किती बिकट परिस्थितीत देशाच्या सीमेचे रक्षण करतात याची माहिती लोकांना व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे लष्कराच्या सुत्रांकडून कळते.

लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडल्याचे लष्करातील सुत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. यात म्हटले की, सियाचीनची सफर करताना सामान्य जनतेला आपले जवान किती कठीण परिस्थितीत येथे तैनात आहेत. त्यांना दररोज किती आव्हानांचा समाना करावा लागतो. इथल्या अत्यंत बिकट वातावरणात त्यांना कशा प्रकारे डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करावे लागते हे जवळून पाहता येईल.

नुकत्याच झालेल्या एका परिषदेत बोलताना लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, सैन्याने यापूर्वीच त्यांच्या प्रशिक्षण संस्था सर्वसामान्यांना भेटीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यानंतर आता सीमेवरील लष्काराच्या पोस्ट ज्यामध्ये अतिउंचावरील सियाचीन ग्लेशिअर सारख्या ठिकाणांचाही समावेश असेल, असे त्यांनी म्हटले होते, असे लष्करी सुत्रांनी सांगितले आहे.

भारतीय लष्कराकडून सर्वसामान्य नागरिकांना सियाचीन ग्लेशिअरजवळच्या भागात जाण्यास परवानगी नाही. सध्या केवळ येथून जवळ राहणारे स्थानिक नागरिक आणि लष्करासाठी हमाल म्हणून काम करणाऱ्या स्थानिकांनाच येथे जाण्याची परवानगी दिली जाते. दरम्यान, या प्रस्तावावर अद्याप लष्कराकडून कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही.

एएनआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, लडाखमध्ये पर्यटनासाठी येणारे नागरिक लष्कराकडे कारगिल युद्धाची जागा तसेच ‘टायगर हिल’ हे ठिकाण जे भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याशी लढा देऊन पुन्हा मिळवले होते. या ठिकाणी भेट दण्याची परवनागी मागतात. दरम्यान, समुद्रसपाटीपासून ११,००० हजार फुटांवर असलेल्या सियाचीन ग्लेशिअरमधील सियाचीन बेस कँम्पपर्यंत जाण्यासाठी भारताने सन २००७ पासून ट्रेकर्सना परवानगी दिली आहे.