व्हिसा घेऊन इंग्लंडमध्ये राहणाऱया परदेशी नागरिकांना यापुढे नव्याने हमी शुल्क द्यावे लागेल. इंग्लंडमधील वास्तव्यात परदेशी नागरिक तेथील नियम मोडणार नाहीत, याची हमी म्हणून हे शुल्क आकारण्यात येणार आहे. इंग्लंडच्या गृह मंत्री थेरेसा मे यांनी या नव्या तरतुदीचा आराखडा तयार केला. 
नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये येणाऱया परदेशी नागरिकांसाठीच्या व्हिसा नियमांमध्ये सध्या सुधारणा करण्यात येत आहेत. त्याअंतर्गतच हमी शुल्क ही नवी योजना लागू करण्यात आलीये. नव्या नियमानुसार व्हिसा मुदतीपेक्षा कोणी जास्त दिवस राहिल्याचे आढळल्यास किंवा तेथील नियमांचे उल्लंघन केल्यास हमी शुल्क म्हणून घेतलेली रक्कम जप्त करण्यात येईल.
युरोपियन युनियनमधील देशांतून येणाऱया नागरिकांकडून मात्र असे शुल्क आकारण्यात येणार नाही. कोणकोणत्या देशांतून इंग्लंडमध्ये स्थलांतरित होणाऱयांचे प्रमाण जास्त आहे, याचा अभ्यास करून ते प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजण्यात येत असल्याचे गृह खात्यातील अधिकाऱयांनी सांगितले.
पुढील काळात इंग्लंडमध्ये येणाऱया प्रवाशांकडून हमी पत्र घेण्यात येणार आहे. हमी पत्रात इंग्लंडमधील नियमांचे परदेशी नागरिक उल्लंघन करणार नाहीत आणि मुदत संपल्यावर ते मायदेशी परततील, असे लिहून घेण्यात येईल. हमी शुल्क म्हणून घेतलेली रक्कम मायदेशी गेल्यावर परत देण्यात येईल.