अनेक रुग्णांचे बळी घेतल्याचा आरोप असलेले भारतीय वंशाचे डॉक्टर जयंत पटेल यांची दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्याचा निर्वाळा देत ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने त्यांची मुक्तता केली आहे. मेलबर्नमधील एका सरकारी रुग्णालयात नोकरीला असलेल्या डॉ. पटेल यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. २००६मध्ये घडलेल्या या घटनेनंतर डॉ. पटेल यांच्यावर सेवेत निष्काळजीपणा केल्याचा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल साडेसात वष्रे हा खटला चालल्यानंतर गेल्याच आठवडय़ात पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. पटेल सध्या अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यांनी ७८८ दिवस कोठडीत काढले, तर आरोपी हस्तांतर प्रक्रियेत १३१ दिवस गेल्याने त्यांची शिक्षा पूर्णच झाली आहे, असा निर्वाळा देत त्यांची मुक्तता करण्यात आली.
साडेसात वर्षांत पटेल यांच्यावर ३५ लाख डॉलर खर्च झाले, असे मेलबर्न प्रशासनाने सांगितले.