कमल हसन यांच्या ‘विश्वरूपम्’ चित्रपटावरून निर्माण झालेला वाद किंवा आशीष नंदी यांनी दलितांविरोधात केलेल्या वक्तव्यांवरचा वाद बघितला तर समाजात असहिष्णुतेची संस्कृती वाढत असल्याचे ध्यानी येते, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी येथे व्यक्त केले.
लेखक सलमान रश्दी यांना कोलकाता येथील साहित्य महोत्सवात नाकारण्यात आलेला प्रवेश हेही अशाच प्रकारचे उदाहरण असल्याचे नमूद करून थरूर यांनी त्याबद्दलही खेद व्यक्त केला. एखाद्याने व्यक्त केलेल्या मतामुळे दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाऊन त्याचे पर्यवसान हिंसेत होणार नाही, एवढा तरी समतोल काळजीपूर्वक सांभाळला गेला पाहिजे, असे थरूर यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीस मुलाखत देताना सांगितले.
एखाद्याने विशिष्ट मत व्यक्त केल्यानंतर दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे ती व्यक्ती त्यावर प्रतिवाद करते. त्यावर चर्चा, वाद झडतात, याकडे थरूर यांनी लक्ष वेधले.
सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यानंतर कमल हसन यांच्या ‘विश्वरूपम्’ चित्रपटावर बंदी घालायला नको होती, असे मत थरूर यांनी मांडले.