जम्मू-काश्मीरच्या पांथा चौकात सोमवारी CRPF च्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात CRPF चे सहा जवान जखमी झाल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. भारतीय सुरक्षा दलांवर दुसऱ्यांदा अशाप्रकारे हल्ला करण्यात आल्याची ही गेल्या दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. आमची तुकडी जम्मूकडून श्रीनगरच्या दिशेने जात होती. यावेळी दहशतवाद्यांनी आमच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सहा जवान जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सीआरपीएफचे प्रवक्ते बी. चौधरी यांनी दिली.

यापूर्वी रविवारी दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीर पोलीस आणि संसदीय सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकावर हल्ला चढवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नई- नशेरी या देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या बोगद्याच्या उद्घाटनसाठी काश्मीरमध्ये आले असताना हा प्रकार घडला होता. या हल्ल्यात पोलिस दलातील एक कर्मचारी शहीद झाला होता तर ११ जण जखमी झाले होते. संध्याकाळी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या तुकड्या परतत असताना हा प्रकार घडला होता. मागील आठवड्यातदेखील पंथाचौक बायपास रोडजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले होते.