सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरु असून आर. एस. पुरा सेक्टर येथे पाकने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक जवान शहीद झाला. तर सीमा रेषेजवळील गावात राहणारे तीन नागरिकही या गोळीबारात जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आर. एस. पुरा सेक्टर येथे बुधवारी रात्री पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आर. एस. पुरा सेक्टर येथील सीमा रेषेवरील निवासी भागाला पाक सैन्याने लक्ष्य केले. पाकच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. तर एक जवान आणि तीन नागरिकही या गोळीबारात जखमी झाले आहेत. पाक सैन्याने उखळी तोफांचा माराही केला.

पाक सैन्याने रात्री नऊच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, असे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात शनिवारी पाकच्या गोळीबारात धुळ्यातील वीरपुत्र योगेश भदाणे शहीद झाले  होते. योगेश यांचा विवाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता. ते राजौरीतील सुंदरबनी सेक्टरमधील सीमेवर तैनात होते. गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ८६० घटना घडल्या असून २०१६ मध्ये हेच प्रमाण २२१ एवढे होते.  तर पाकच्या गोळीबारात भारतीय लष्कराचे एकूण २८ हून अधिक जवान शहीद झाले. २०१७ मध्ये पाकच्या गोळीबारात भारताचे सत्तर जवान जखमी झाले.