जम्मू-काश्मीरच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असताना, १७ वर्षीय फलंदाजाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. जहांगीर अहमद वार असं या तरुण खेळाडूचं नाव असून तो जम्मू-काश्मीर सरकारच्या क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत होता. बारामुल्ला विरुद्ध बडगाम जिल्ह्याच्या संघामध्ये होणाऱ्या सामन्यात हा प्रकार घडला आहे.

उसळत्या चेंडूवर हुकचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू जहांगीरच्या मानेवर जाऊन आदळला. हा फटका बसल्यानंतर जहांगीर जागेवरच कोसळला, मैदानातील इतर खेळाडूंनी व स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु होण्याआधीच जहांगीरने आपले प्राण गमावले होते. घडलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे. जहांगीरने फलंदाजीदरम्यान स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरण (हेल्मेट, थायपॅड इ.इ.) घातली होती असं स्पष्टीकरण स्थानिक क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

जहांगिर हा बारामुल्ला जिल्ह्यातला रहिवासी होता. जम्मू-काश्मीर राज्यपालांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत जहांगिर आपल्या संघाकडून खेळत होता. जहांगीरच्या दुर्दैवी निधनानंतर स्थानिक क्रिकेटपटूंनीही हळहळ व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा – उपांत्य सामन्यात धोनी बाद झाल्याचा चाहत्याला धक्का, गमावले प्राण