आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आम आदमी पक्षा’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी उत्तरप्रदेशात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. लोकसभेच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणा-या उत्तरप्रदेशातील ‘आप’च्या कौशंबी येथील कार्यालयापासून केजरीवालांनी शनिवारपासून ‘झाडू चलाओ’ यात्रेला सुरूवात केली आहे. या प्रचारयात्रेदरम्यान अरविंद केजरीवाल उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद, पिल्खुवा, हापूर, आमरोहा, मोरादाबाद, रामपूर, बरेली, शाहजहानपूर आणि हरदोई या मतदारसंघांमध्ये जाऊन ‘आप’चा प्रचार करणार आहेत. उत्तरप्रदेशात राज्यकर्त्यांनी आजपर्यंत जातीचे आणि धर्माचेच राजकारण केले. मात्र, येणा-या काळात ‘आम आदमी पक्ष’ उत्तरप्रदेशात विकासाचे राजकारण करण्यावर भर देईल असे या प्रचारयात्रेत अरविंद केजरीवालांबरोबर असणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते मनिष सिसोदिया यांनी सांगितले आहे. दरम्यान रविवारी ही यात्रा उन्नाव येथून सुरू होऊन कानपूरला पोचणार आहे. याठिकाणी केजरीवाल यांची सभा होणार आहे. तसेच येथे ते अनेक नेत्यांसह सामाजिक व व्यापार क्षेत्रातील व्यक्तींना भेटणार आहेत. तीन मार्चला ते आग्र्याकडे जाणार आहेत.