केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पंतप्रधान मोदींना सांगितलं की, राज्यातला करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं आता राज्य तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना इथून पुढे ऑक्सिजनचा पुरवठा करु शकणार नाही. आत्तापर्यंत केरळ या राज्याकडून तमिळनाडू आणि कर्नाटकला ऑक्सिजन पुरवला जात होता.

पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विजयन म्हणतात, राज्यात २१९ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. ही सध्याची गरजच आहे. आणि आता राज्य इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवू शकणार नाही. त्यामुळे केरळमध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन तिथेच वापरण्याची परवानगी मिळावी.

४५० टनांचा ऑक्सिजनचा राखीव साठा आता ८६ टनांवर आलेला आहे आणि राज्यातला करोनाचा प्रादुर्भावही वेगाने वाढत आहे. त्यामुळे केरळला ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात सूट देण्यात येण्याची मागणी विजयन यांनी केली आहे.

केरळमध्ये सध्या ४.२३ लाख रुग्ण उपचाराधीन आहेत आणि त्यामुळे राज्याचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचा दर आता सर्वाधिक म्हणजे २८ टक्क्यांवर पोहोचला आहे. लवकरच राज्यातल्या एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाखांचा आकडा ओलांडण्याची शक्यता दिसून येत आहे.