पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर केलेल्या टीकेला शुक्रवारी सोनिया गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. लोकशाही कोणाच्या मनमर्जीने चालू शकत नाही, असे मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले होते. त्याला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी ‘त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू द्या’, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, काँग्रेसच्या सदस्यांनी शुक्रवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही. तर लोकसभेच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला.
‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर त्यांना येत्या १९ डिसेंबर रोजी दिल्लीतील न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. या प्रकरणानंतर काँग्रेसने संसदेमध्ये घोषणाबाजी करीत केंद्र सरकार सूडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक सुडाचे राजकारण खेळले जात असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी विरोधकांवर थेट टीका केली. लोकशाही कोणाच्या मनमर्जीने चालू शकत नाही. संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू शकत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. यामुळे केवळ वस्तू व सेवा कर विधेयक नाही, तर गरिबांच्या हिताची अनेक विधेयक प्रलंबित आहेत, असे मोदी यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना सोनिया गांधी यांनी केवळ त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू द्या, असे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.