03 March 2021

News Flash

‘ही निवडणूक म्हणजे पाच वर्षांचे परफॉर्मन्स ऑडिट’

अर्थसंकल्पानंतर निवडणुकीचा मार्ग सोपा झालाय असे वाटते?

ज्यांच्या बोलण्या-खाण्यापासून जवळजवळ प्रत्येकच कृतीची ‘बातमी’ होते असे मोदी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री म्हणजे नितीन गडकरी. मोकळा-ढाकळा स्वभाव, कामांचा प्रचंड झपाटा, माणसे जोडण्याचा व्यासंग अशा विविध गुणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरी यांची ही खास मुलाखत.

 • प्रश्न – अर्थसंकल्पानंतर निवडणुकीचा मार्ग सोपा झालाय असे वाटते?

उत्तर – बजेटनंतर जे निर्णय झाले त्याचा चांगला फायदा दिसत आहे. आम्ही आणखी ताकदवान झालो. म्हणूनच विरोधी पक्ष एक झाले.

 • प्रश्न – तुम्ही ताकदवान झालात तर वेगवेगळ्या पक्षांतून तुम्ही एवढे सगळे गणंग का घेताय? त्यामुळे भाजपचा निष्ठावान दुखावत नाही?

उत्तर – जो मतदारसंघ जिंकायला अवघड आहे. तिथेच आम्ही हे प्रयोग केले. काही प्रमाणात पक्षांतर्गत पडसादही उमटले, पण निवडणूक जिंकायची तर काही तडजोडी कराव्याच लागतात.

 • प्रश्न – पुलावामानंतर निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची भावना आता ओसरतेय, निवडणूक ग्रामीण प्रश्नांभोवती केंद्रित झालीय. हे अडचणीचे ठरेल असे वाटतेय?

उत्तर – महाराष्ट्रापुरते बोलायचे तर येथे सर्वात मोठी समस्या पाण्याची, सिंचनाची आहे. देशात पहिल्यांदाच २० हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेत मिळाले. २६ प्रकल्पांची कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झालीत. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागाकरिता १०८ प्रकल्प बळीराजा योजनेंतर्गत सुरू केलेत.

 • प्रश्न – नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला का?

उत्तर – नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या व्यवहारांना धक्का बसला. नोटाबंदीचे दीर्घकालीन परिणाम देशाला दिसतील.

 • प्रश्न – तुम्ही अर्थमंत्री आहात असे गृहीत धरले तर तुम्ही असाच नोटाबंदीचा निर्णय घेतला असता?

उत्तर- मी अर्थमंत्री नाही. होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे उत्तर कसे देऊ? ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारच्या निर्णयाचे मी समर्थनच करणार.

 • प्रश्न – तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक देण्याची घोषणा केली. काँग्रेस तर आता महिन्याला सहा हजार देणार आहे. काय सांगाल?

उत्तर – निवडणूक आली की सर्वच पक्ष अशा घोषणा करतात. अशा योजनांमध्ये तीन-साडेतीन लाख कोटी रुपये गेले तर पाण्याकरिता, रस्त्याकरिता, पायाभूत सुविधांसाठी पैसे उरतील? दुसरे, हा पैसा आणणार कुठून?

 • प्रश्न – सुटबुटातले सरकार असा आरोप होताच सरकारने एकदम समाजवादी वळण घेतले. हे का?

उत्तर – काळानुसार समाजवाद, साम्यवाद, पुंजीवाद सर्व संपले. आता जगात चौथ्या पर्यायाची चर्चा सुरू आहे. आम्ही २६ जानेवारीला हेलिकॉप्टर आणि एअरफोर्सचे विमान बायोएव्हिएशन इंधनावर चालवले. ३० हजार कोटींचे ऑइल आम्ही इम्पोर्ट करतो. उद्या आमच्या जंगलात आदिवासी आणि शेतकऱ्यांनी हे तयार केले तर अर्थव्यवस्थेत क्रांती येईल.

 • प्रश्न – पण, ही विकासाची दृष्टी निवडणुकीत उपयोगी पडते की परत जातीचे, धर्माचे मुद्दे येतात.

उत्तर – मी नागपुरात राहतो, मुख्यमंत्री राहतात. आमची जात कुणी पाहात नाही. मी अर्ज भरताना ४०-५० हजार लोक आले होते. त्यातले ४००-५००ही माझ्या जातीचे नसतील. शेवटी विकासाला नजरेआड करता येणार नाही.

 • प्रश्न – सध्या भाजपचा नाही तर मोदींचा विजय असे म्हटले जाते. काय सांगाल?

उत्तर – मोदी पण भाजपचेच आहेत. भाजप कोणत्याही एका व्यक्तीचा पक्ष नाही.

 • प्रश्न – ही निवडणूक ज्यावर लढली जाईल ते सर्वात प्रमुख मुद्दे कोणते?

उत्तर – पाच वर्षे मोदींच्या नेतृत्वात आमच्या सरकारने जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक आहे.

 • प्रश्न – चौकीदार नितीन गडकरी, चौकीदार देवेंद्र फडणवीस, हे सर्व हास्यास्पद आहे, असे वाटत नाही का?

उत्तर – मला कसे वाटणार? हा कॅम्पेनचा प्रकार आहे. जसा चौकीदार एका इमारतीचा रक्षक असतो तसा मी देशाचा चौकीदार आहे, असे म्हणण्यात गैर काय?

 • प्रश्न – मुरली मनोहर जोशी, अडवाणी यांना सन्मानाने निरोप देता आला नसता?

उत्तर – मुरली मनोहर जोशी, अडवाणीजी हे पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांच्याबद्दल आदर, सन्मान कायमच आहे. पण, प्रत्येक क्षेत्रात पिढी बदलत असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 • प्रश्न – देशाच्या निकालाचे चित्र कसे असेल?

उत्तर – मागच्या वेळी जितक्या जागा मिळाल्या, तेवढय़ा तर नक्की  मिळतीलच शिवाय काही अधिकच्याही मिळतील आणि मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 1:11 am

Web Title: loksatta interview with nitin gadkari 2
Next Stories
1 अखेरचा हा तुला दंडवत
2 ‘मिशन शक्ती’ मधील चाचणी धोका टाळण्यासाठी कमी उंचीवर- रेड्डी
3 आरोपपत्र फुटल्याची चौकशी करण्याची ईडी, मिशेल यांची न्यायालयाकडे मागणी
Just Now!
X