मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत शेती आणि नोकऱ्या हे दोन प्रमुख मुद्दे आहेत. रविवारी अलीराजपूर जिल्ह्यात भाजपाची जनसभा सुरु असताना एका युवकाने रोजगाराच्या मुद्यावरुन भाजपा उमेदवार माधव सिंह दावर यांच्याबरोबर वाद घातला. जोबात विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार माधव सिंह दावर उमदा गावात एका जनसभेला संबोधित करत असताना एक युवक समोर आला व त्याने रोजगारावरुन दावर यांना प्रश्न विचारले.

तुम्ही नोकऱ्या देणार म्हणून आश्वासन दिले होते. कुठे आहेत नोकऱ्या ? असा प्रश्न त्या युवकाने विचारला. ग्रामीण आणि आदिवासी युवकांच्या रोजगारासाठी इतक्या वर्षात तुम्ही काय केले ? दावर त्या युवकाच्या प्रश्नाला उत्तर देणार त्याआधीच त्याने समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली. गावातील वेगवेगळया शाळांसाठी फक्त एकच शिक्षक आहे आणि हा शिक्षकही शिकवण्यासाठी फार इच्छुक नसतो. शिक्षणाची ही अशी परिस्थिती आहे. त्यानंतर त्याने बेरोजागारीचा मुद्यावरुन प्रश्न विचारले.

दावर यांच्या समर्थकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याचे सर्व ऐकून घेतल्यानंतर दावर यांनी त्या युवकाला तुला वाटत असेल तर मला मत दे, अन्यथा देऊ नकोस असे सांगितले. ५६ वर्षीय माधव सिंह दावर यांना भाजपाने जोबात येथून चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. यापूर्वी ते २००३ आणि २०१३ मध्ये इथून निवडून आले आहेत. २००८ साली सुलोचना रावत यांनी माधव सिंह दावर यांना पराभूत केले होते.