पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपास पथकाने (सीबीआय) या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याला अधिकृत ई-मेल आयडीवर पत्र लिहून चौकशीला सहकार्य करण्याची विनंती केली होती. याला नीरव मोदीने उत्तर दिले आहे. माझे परदेशातही उद्योग व्यवसाय असल्याने मी चौकशीत सहभागी होऊ शकत नाही, असे त्याने म्हटले आहे.


भारताच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठ्या घोटाळ्यात २६ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि गितांजली जेम्सचा मालक मेहुल चोक्सी यांच्यासंबंधीत १३०० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. त्यानंतर अनेक घोटाळे समोर येताना ही रक्कम १२,६०० कोटींपर्यंत पोहोचली.

दरम्यान, यापूर्वी सीबीआयने चौकशीत सहभागी होणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीकडून गितांजली समूहाच्या १० मोठ्या अधिकाऱ्यांना लुक आऊट नोटीसही पाठवली होती. सीबीआयने २४ फेब्रुवारी रोजी पीएनबी घोटाळाप्रकरणी बँकेचे प्रबंध निदेशक यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता आणि कार्यकारी निदेशक के. वी. ब्रह्माजी राव यांची चौकशी केली. या दोन्ही अधिकाऱ्यांना मुंबईच्या कार्यालयातून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ८ तास त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, नीरव मोदी, त्याचे कुटुंबिय आणि मामा चोक्सी हे जानेवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात देश सोडून गेले होते. सुरुवातीला एफआयआरमध्ये ६४०० कोटींच्या फसवणूकीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने चोक्सीच्या गितांजली समूहाविरोधात ४,८८६ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी दुसरी एफआयआर दाखल केली होती.