फ्रान्स येथे होत असलेल्या जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारासह काश्मीर प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

जी-७ शिखर परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले होते. परिषदेसाठी मोदी बहरीनवरून फ्रान्समधील बियारित्झ शहरात रविवारी सायंकाळी दाखल झाले.  परिषदेत मोदी यांचे भाषण होणार असून ते पर्यावरण, वातावरणातील बदल आणि डिजिटल बदल याविषयांवर मोदी बोलणार आहे. त्याचबरोबर बियारित्झमध्ये दाखल झाल्यानंतर मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. बोरिस आणि मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. या भेटीची माहिती मोदी यांनी ट्विट करून दिली आहे. व्यापार, संरक्षण आणि संशोधन क्षेत्रातील संबंध वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

या परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक होणार आहे. काश्मीर मुद्यावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी आणि काश्मीरमध्ये मानवी अधिकाराचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प मोदीशी चर्चा करणार असल्याचे अमेरिकन प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. तो भारताचा अंतर्गत विषय आहे. पण त्यामुळे प्रादेशिक गुंतागुंत तयार झाली आहे. तणाव कमी करण्यास भारत आणि पाकिस्तानने समोर यावे अशीच अमेरिकेची इच्छा आहे. ट्रम्पही त्याअनुषंगाने मोदी यांच्याशी बोलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.