शरद पवार यांना राजकीय हवामानाची चांगली माहिती असते. देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे समजून घ्यायचे असेल, तर काही वेळ शरद पवारांसोबत बसले पाहिजे, अशी मिश्कील टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. शरद पवार यांच्या ७५ निमित्त नवी दिल्लीमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या कार्याचे कौतुक केले.
मोदी म्हणाले, कृषिमंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या शरद पवार यांनी शेतकऱ्यांमधील एका गुणाचा राजकारणात चांगला उपयोग केला आहे. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे हवामानाचा अंदाज असतो. त्याचप्रमाणे शरद पवार यांनाही राजकीय हवामानाची चांगली माहिती असते. देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे समजून घ्यायचे असेल, तर काही वेळ शरद पवारांसोबत बसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या टिप्पणीला सभागृहातील सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.