इटलीतील दोन नाविकांनी केरळमधील मच्छिमारांची हत्या केल्याचा तपास एनआयएकडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयामध्ये या खटल्याची दररोज सुनावणी घेण्यात यावी, असाही आदेश न्यायालयाने दिला.
सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. विशेष न्यायालयाकडे या खटल्याव्यतिरिक्त अन्य कुठलाही खटला सोपविण्यात येऊ नये, असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. या प्रकरणातील आरोपी असलेले इटलीचे नाविक मॅसिमिलिआनो लॅटोर आणि सॅल्व्हाटोर गिरोन यांचा ताबा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडेच असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणाची सुनावणी एनआयएकडे देण्यास इटली सरकारने विरोध केला होता. हे प्रकरण एनआयएच्या कक्षेत येत नाही, असा दावा तेथील सरकारने केला होता. मात्र, न्यायालयाने ते फेटाळला.