भारताकडून करण्यात येणाऱ्या तेलआयातीचे मूल्य १६० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा कमी होऊ नये यासाठी तेल आयात करणाऱ्या लॉबीकडून पेट्रोलियममंत्र्यांना धमक्या दिल्या जातात, असे वक्तव्य पेट्रोलियममंत्री एम. वीरप्पा मोइली यांनी केल्याने शुक्रवारी संपूर्ण देश सुन्न झाला.
मोइली यांनी सदर वक्तव्य करताच विरोधकांनी त्यावर जोरदार टीका केली असून त्यापैकी काही जणांनी तर मोइली हे खोटारडे असल्याचेही म्हटले आहे.
रिलायन्स उद्योग समूहाच्या फायद्यासाठी गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्याचा आरोप भाकपचे गुरुदास दासगुप्ता यांनी मोइली यांच्यावर केला होता. गॅससाठी योग्य दर देऊन गुंतवणूकदारांच्या भावनांना पुनरुज्जीवित करण्याचा आपला प्रयत्न होता, असे दासगुप्ता यांनी म्हटले.
योग्य दर मिळाल्यास त्याचा फायदा मंदी आलेल्या तेल आणि गॅसस्रोतांचा शोध घेण्याच्या क्षेत्रात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी होईल व त्यामुळे देशांतर्गत उत्पन्न वाढेल आणि आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे दासगुप्ता म्हणाले.
आपल्या देशात गॅस आणि तेल उपलब्ध आहे, मात्र आपण त्याच्या स्रोतांचा शोध घेत नाही. तसे न करण्यासाठी आपण प्रत्येक अडथळ्याचा आधार घेतो. नोकरशाहीचे अडथळे आणि विलंबही आहेतच. मात्र याशिवाय अन्य लॉबी कार्यरत असून या लॉबीला भारताने आयात थांबवावी, असे वाटत नाही अशा काही लॉबी याच कामात सक्रिय आहेत. या खात्याच्या प्रत्येक मंत्र्याला धमकी देण्यात येते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मंत्र्यांना थेट अथवा अप्रत्यक्षपणे धमकी देणाऱ्याचे नाव सांगण्यास अथवा त्याच्याकडे निर्देश करण्यास मोइली यांनी नकार दिला.