मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या हत्येच्या खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या सरकारी वकिलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका २२ वर्षीय युवकाला अटक केली आहे. हा युवक कायद्याचा विद्यार्थी असून त्याच्या वडिलांना लष्करातून बडतर्फ करण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांचे नाव अब्दुल्लाह उमर असे असून त्याला गुरुवारी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली. उमर हा इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ इस्लामाबादचा विद्यार्थी आहे. बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याच्या वडिलांना लष्करातून बडतर्फ करण्यात आले आहे.
इस्लामाबादचे पोलीस प्रमुख बिन यामीन खान यांनी उमर याच्या अटकेला दुजोरा दिला असून त्याचे तालिबान्यांशी संबंध आहेत. रावळपिंडी आणि अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये हात असलेले दहशतवाद्यांचे एक जाळेही उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मुंबईवरील हल्ला आणि भुत्तो हत्याप्रकरण हाताळणारे ज्येष्ठ सरकारी वकील चौधरी झुल्फिकार अली यांची ३ मे रोजी इस्लामाबादमध्ये हत्या करण्यात आली होती. उमर याचा अली यांच्या हत्येशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले असल्याचा दावा पोलिसांनी केला. अली यांच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात उमरच्या मणक्याला गोळी लागल्याने त्याचा कमरेखालील भाग निकामी झाला आहे.