“पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणं थांबवावं, अन्यथा या देशाचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही”, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच, “जर पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रय़त्न केला तर भारतीय लष्कर त्यांना परतण्याची संधीच देणार नाही”, असा इशाराही संरक्षणमंत्र्यांनी दिला.

शनिवारी, गुजरातच्या सुरतमध्ये १२२ शहिदांच्या कुटुंबीयांचा एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये बोलताना, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषेकडे कूच करु नये असं वक्तव्य केलं होतं. यावरुन बोलताना राजनाथ यांनी, “पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या नागरिकांना नियंत्रण रेषा ओलांडू नका, असा उत्तम सल्ला दिला आहे. कारण, भारतीय सैन्य सज्ज आहे ते तुम्हाला परतण्याची संधी देणार नाही”, असा इशारा दिला.


याशिवाय, पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत बोलताना राजनाथ म्हणाले की, “पाकिस्तान त्यांच्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षा पुरवण्यात असमर्थ आहे आणि ते मानवाधिकारांच्या बाता मारतात. जर मानवाधिरांचं उळ्लंघन जर कुठे होत असेल तर ते पाकिस्तानमध्ये होत आहे. भारतातील अल्पसंख्याक सुरक्षित होते, आहेत आणि भविष्यातही राहतील”. पुढे बोलताना, स्वातंत्र्यानंतर भारतातील अल्पसंख्याकांच्या लोकसंख्येत वाढ झाली. परंतु पाकिस्तानमध्ये शीख, बौद्ध व इतरांचे मानवी हक्क पायदळी तुडवण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. अन्य कुणी पाकिस्तानचे तुकडे करण्याची गरज नाही. दहशतवादाला पाठीशी घालणे थांबवले नाही, तर पाकचे आपोआप तुकडे होतील.’ असं राजनाथ म्हणाले.

“काश्मीरमधून कलम 370 हटवण्यातचा भारताचा निर्णय पचवणं पाकिस्तानला अवघड जातंय. या मुद्द्यावरून त्यांनी संयुक्त राष्ट्रांपर्यंत जाण्याचा व त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही”, असेही राजनाथ यांनी यावेळी नमूद केले.