अनिल अंबानींना वाचवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आलोक वर्मा हे राफेल करारासंदर्भातली चौकशी करत होते. आलोक वर्मा यांना फक्त पदावरून हटवण्यात आले नाही तर त्यांची रुमही सील करण्यात आली आणि त्यातून महत्त्वाची कागदपत्रंही दूर करण्यात आली. पहाटे दोनच्या सुमारास हा सगळा प्रकार झाला असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे या सगळ्या खटपटी अनिल अंबानींना वाचवण्यासाठी सुरु आहेत असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल कराराबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. आपण या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकू अशी भीती त्यांना वाटते आहे. त्यांना तुम्ही पत्रकार परिषद घ्यायला सांगा आणि राफेलबद्दल चार-पाच प्रश्न विचारा मला खात्री आहे की ते टेबलसकट पळून जातील असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.