केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अभिनेता प्रकाश राज यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सतत केंद्र सरकारवर टीका केल्याने चर्चेत असणाऱ्या प्रकाश राज यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं आहे. राफेल प्रकरणात मोदींनी पळ काढला आणि एका महिलेला म्हणजेच निर्मला सीतारमन यांना स्वत:च्या रक्षणासाठी मैदानात उतरवले, असे विधान राहुल गांधींनी केले होते.

‘राहुल गांधी महिलांविरोधात नाही आहेत. त्यांनी एका तृतीयपंथीय कार्यकर्त्याची महत्त्वाच्या पदी नियुक्ती केली आहे. तुम्ही त्यांच्या विधानाकडे एकाच दृष्टीकोनातून का पाहत आहात ? मोदींनी राफेल प्रश्नांवर उत्तर दिलं नाही हे खरं नाही आहे का ? ते संसदेत उपस्थित होते का ?’, अशी विचारणा प्रकाश राज यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी राफेल चर्चेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतून पळ काढला आणि एका महिलेला आपल्या बचावासाठी उभं केलं अशी टीका केली होती. ‘जनतेच्या न्यायालयात 56 इंचाची छाती असणारा चौकीदार पळून गेला आणि एका महिलेला (निर्मला सीतारामण) सांगतो की माझी रक्षा करा’, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं.

नरेंद्र मोदींनी राहुल गांधीच्या वक्तव्यावर टीका करत त्यांनी महिलेचा अपमान केला असल्याचं म्हटलं होतं. ‘हा फक्त एका महिलेचा नाही तर देशातील सर्व महिला शक्तीचा अपमान आहे. यासाठी या बेजबादार नेत्यांनी किंमत मोजावी लागेल’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.

यासंबंधी महिला आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तुमच्या या विधानातून महिलेचा अनादर केल्याचे दिसते असं महिलाय आयोगाने म्हटलं आहे. महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने महिलेसंदर्भात बेजबाबदार विधान करणे अयोग्य असल्याचे महिला आयोगाला वाटते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता नोटीस मिळाल्यावर तुम्ही महिला आयोगासमोर स्पष्टीकरण द्यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.