झारखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी रघुवर दास (६०) यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय दलाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत दास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १४ वर्षांत प्रथमच झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी बिगर आदिवासी व्यक्ती स्थानापन्न होणार आहे. उद्या, रविवारी दास पदाची शपथ घेतील. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३७, तर मित्रपक्ष अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला पाच जागा मिळाल्या आहेत.
झारखंड भाजपचे उपाध्यक्ष असलेल्या दास यांची पाश्र्वभूमी कामगार चळवळीतील आहे. त्यांनी सातत्याने कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी झंझावाती प्रचार करत भाजपला यश प्राप्त करून दिले. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे अर्जुन मुंडा यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने दास हेच भाजपचे भावी मुख्यमंत्री असतील अशी अटकळ होती. केंद्रीय निरीक्षक जे. पी. नड्डा आणि विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली.
या बैठकीत दास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दास यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानुसार रविवारी २८ डिसेंबरला ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. आपले सरकार विकासकामांना प्राधान्य देईल, असे सांगतानाच असंघटित क्षेत्रातील कामगार, अनुसूचित जाती व जमाती व गरिबांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असेल, असेही दास यांनी सांगितले.

*भाजप-एजेएसयू यांची निवडणुकीपूर्वीच युती झाली होती व त्यांना विधानसभा निवडणुकीत ८१ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या.
*दास हे भाजपचे झारखंडमधील तिसरे मुख्यमंत्री असतील. याआधी बाबुलाल मरांडी व अर्जुन मुंडा यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले होते. मरांडी यांनी भाजप सोडून झारखंड विकास मोर्चा या पक्षाची स्थापना केली, पण त्यांचा धनवर व गिरिदीह येथे पराभव झाला. त्यांच्या पक्षाला आठ जागा मिळाल्या होत्या. मुंडा यांनाही निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला.
*आम्ही चांगले व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ. असंघटित क्षेत्रातील ९३ टक्के लोक तसेच अनुसूचित जातिजमाती व गरीब यांच्यासाठी आपण काम करू, असे दास यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
*दास हे जयप्रकाश नारायण व अटलबिहारी वाजपेयी, साहित्यिक रामधारीसिंह दिनकर यांचे चाहते आहेत. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९५४ रोजी जमशेदपूर (पूर्व) येथे झाला व त्यांनी १९७४ मध्ये विद्यार्थी चळवळीत भाग घेतला होता. टेल्को कामगार आंदोलनातही ते सहभागी होते.